फिडे महिला ग्रँड प्रिक्स पुणे - हम्पीने दिव्याचा विजयरथ रोखला
गेल्या दोन फेऱ्यांमध्ये दणक्यात खेळत असलेल्या IM दिव्या देशमुखला GM कोनेरू हम्पीने पराभवाची चव चाखवत तिचा विजयरथ रोखला. सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत हम्पी म्हणाली की, "मी एक नवीन ओपनिंग प्रकार खेळला, पटावर एक वेगळी स्थिती निर्माण केली आणि त्यामधून मी तिला खेळत खेळत हरवले." दरम्यान, GM हरिका द्रोणावल्लीने सनसनाटी पुनरागमन करत IM नुर्ग्युल सालिमोव्हा (बग्लेरिया) हिच्यावर मात करत स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला. IM बटखुयाग मुंगुंटूल (मंगोलिया) हिने IM अलीना काशलिन्स्काया (पोलंड) हिच्या क्वीन साईडवर जोरदार आक्रमण करत विजय मिळवला. GM आर. वैशाली हिने IM पोलिना शुवालोव्हा हिच्याशी बरोबरी साधली. GM झू जायनर (चीन) हिने IM मेलिया सालोमे (जॉर्जिया) हिच्याशी बरोबरी खेळत 2.5/3 गुणांसह एकमेव आघाडी मिळवली आहे. हम्पी, दिव्या, पोलिना आणि बटखुयाग यांच्याकडे सध्या प्रत्येकी २/३ गुण आहेत. हरिका १.५/३ गुणांवर पोहोचली आहे. स्पर्धेची चौथी फेरी आज दुपारी 3 वाजता (IST) सुरू होणार आहे. फोटो : अनमोल भार्गव / फिडे
हरीकाची स्पर्धेतील पहिली जीत, झू जायनरची एकल आघाडी
हम्पी - दिव्या १-०
GM कोनेरू हम्पी (रेटिंग 2528) आणि IM दिव्या देशमुख (रेटिंग 2460) यांच्यात आजवर फक्त एकदाच क्लासिकल प्रकारातील सामना झाला होता. तो सामना मागच्या वर्षी बरोबरीत सुटला होता. मात्र यावेळी हम्पीने पहिल्या विजयासाठी निर्धार करून आलेली दिसली. हम्पीने इंग्लिश ओपनिंगची निवड केली आणि मिडल गेम मध्ये दिव्याकडून एक पोझीशनल चूक झाली. त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत हम्पीने तिच्यावर वर्चस्व गाजवत सामन्यात मात केली. हा हम्पीचा या स्पर्धेतील पहिला विजय होता.
18...e5 खेळल्यामुळे आपल्याच काळ्या घरातील उंटाला ब्लॉक केले व पांढऱ्या मोहोऱ्यांनी खेळणाऱ्या हम्पीने लागलीच १९. Nxg6 खेळले. सद्यस्ठीतीचा विचार करता हम्पीला टी चाळ खेळणे केव्हाही आवडलेच असते. पुढे डाव 19...fxg6 20.Qb1 Ne7 21.Rc1 Qb6 22.b4 cxb4 23.Rxc8 Rxc8 24.axb4 Nd5 25.Ng5+ hxg5 26.Bxd5 असा सुरु राहिला आणि हम्पीने बारकावे शोधात प्रत्येक चाल सावधपणे खेळली व डावाच्या शेवटी विजय मिळवत आपला स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.
नुर्ग्युल - हरीका ०-१
GM हरिका द्रोणावल्ली (रेटिंग 2488) आणि IM नुर्ग्युल सालिमोव्हा (बुल्गारिया, रेटिंग 2402) यांच्यात आजवर एकदाच क्लासिकल प्रकारातील सामना झाला होता, आणि त्यात हरिकानेच विजय मिळवला होता. यावेळीसुद्धा तिने त्याच परंपरेत सातत्य राखले. सुरुवातीपासूनच हरिकाने नुर्ग्युलवर वर्चस्व मिळवले होते. मात्र एंडगेममध्ये तिने थोडीशी ढिलाई दाखवत बुल्गेरियन खेळाडूला परत खेळात येण्याची संधी दिली. मात्र निर्णायक क्षणी नुर्ग्युलकडून पुन्हा एक चूक झाली, आणि त्याचा फायदा घेत हरिकाने पुन्हा आघाडी घेत विजय सुनिश्चित केला.